Coming Soon in Pune & Mumbai...
A documentary based on the life of Arun Sarnaik will be launched soon on 2 August, 2025, in Pune, at Balgandharva & on 24 August, 3-6 PM, at Swatantryaveer Savarkar Smarak, Shivaji Park, Mumbai. Stay tuned...
Few Moments from Kolhapur Documentary Launch, at Govindrao Tembe Rangmandir, Deval Club (22 June, 2025)
Newspaper Articles About Kolhapur Documentary Launch
Testimonial About Documentary
आत्ताच मी एका हृद्य सोहळ्याचा अनुभव घेऊन परतले . एका लेकीने वडिलांना वाहिलेली आगळीवेगळी श्रद्धांजली. चाळीस वर्षांपूर्वी एका दुर्देवी अपघातात मराठी चित्रसृष्टीतला एक लखलखता तारा निखळून पडला. अरुण सरनाईक. या अपघातात त्यांची पत्नी आणि तरुण मुलगाही गेला. मुलगी मिरजेला एम बी बी एस करत होती. ती एकटी राहिली.. कित्येक वर्ष या बातमीने काळजात घर केलं होतं.. ही मुलगी पुढे काय करेल? कशी राहील? कशी जगली असेल? त्यावेळी कल्पनाही नव्हती की ती कधीकाळी आपली मैत्रीण बनेल !
माझ्या नवऱ्याचा- जयदीपचा जिवलग मित्र आजचा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे याचं लग्न सविताशी झालं. आई- वडिलांचं छत्र हरवलेल्या या मुलीला एक अतिशय उच्चविद्यविभूषित, सुसंस्कृत, प्रेमळ कुटुंब मिळालं. सविता हळूहळू या कुटुंबात रुळत गेली. दोन गोड मुलांची आई झाली. सविता – रणजित आमच्या दोघांसाठी बहीण- भावाइतके जवळचे. सारी सुखदु:खं आम्ही एकमेकांबरोबर गेली पस्तीस- सदतीस वर्ष वाटत आलो आहोत. तरीही या साऱ्या वर्षांत सविताच्या या अतीव दुःखाने झाकोळलेल्या अंधाऱ्या कोपऱ्याला आम्ही कधी जाणीवपूर्वक स्पर्श केला नाही. तिला हवं तेव्हा ती तिला पेलवेल इतकं बोलायची. पपा, मॉं आणि तिचा देखणा, हुषार, प्रेमळ ‘दाद्या’ ! तिच्या कोल्हापूरच्या घरात या तिघांचे विलक्षण बोलके मोठे फोटो आहेत. ते पाहाताना नियतीच्या या खेळाची अतर्क्यता जाणवून जिवात कालवाकालव झाल्याशिवाय राहात नाही.
मुलं मोठी झाली. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. हाताशी निवांतपणा गवसला तसं आपल्या पपांविषयी पुस्तक लिहिण्याचं सवितानं ठरवलं. तिने त्यावर कामही सुरू केलं होतं. पुस्तकाचं काम लांबलं. दरम्यान, हा सगळा ऐवज सविताने निराळ्या माध्यमातून मांडायचं ठरवलं. आणि गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत आठवणींचा पट उलगडणाऱ्या एका लघुपटाची निर्मिती केली. नाव फार गोड आणि चपखल : ‘पप्पा सांगा कुणाचे ?’ अरुण सरनाइकांच्या ‘घरकुल‘ चित्रपटातील गाण्याची ही ओळ. प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर रुळलेली. त्यांच्या लेकीने ही कहाणी सांगावी, यापरतं दुसरं औचित्य काय? या लघुपटाचं अनावरण २२ तारखेला कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘देवल क्लब’ मध्ये झालं. २१ जून हा अरुण सरनाईकांचा स्मृतिदिन. या दिवसाच्या अवतीभवती हे लघुपट प्रदर्शित करायचं रणजित- सवितानं ठरवलं. आणि रविवारी हा स्मरणरंजनाचा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी तुडुंब भरलेल्या, प्रेक्षागृहाने एकेकाळच्या आपल्या आवडत्या “हिरो” च्या आठवणी जागवल्या. कोल्हापूरचे छत्रपती शाहूमहाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजयराव महाडिक यांच्या खास उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अरुण सरनाईकांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वाचा मागोवा या पंचाहत्तर मिनिटांच्या लघुपटात घेतला आहे. कलावंत आणि माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. त्यांचे बरेचसे सहकलाकार आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांचा सहवास लाभलेल्या मोहन आगाशे, नाना पाटेकर, जब्बार पटेल अशा काही जुन्या जाणत्या कलाकारांनी आपल्या यात आठवणी जागवल्या आहेत.
या लघुपटात सविताने स्वत: एका अर्थाने सूत्रधाराची भूमिका बजावली आहे.. त्यामुळे हा लघुपट आठवणी, कथनाच्या माध्यमातून थेट हृदयापर्यंत पोचतो. आणि शेवटची काही मिनिटं तर प्रत्येकाचीच पापणी ओलावून जातो…..लघुपट घडतात, biopics होतात. याही लघुपटाच्या घडणीवर बोललं जाईल, त्याच्या भल्याबुऱ्यावर चर्चा घडतील .. तो समीक्षकांचा प्रांत. सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून पाहायचं तर या लघुपटाचा खरा protagonist आहे त्यातून पाझरणारा वेदनेचा अंत:स्वर .. उत्तुंग यशाच्या शिखरावर उभ्या एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला नियतीच्या खेळीसरशी कसं गर्तेत भिरकावलं जाऊ शकतं याची अनाकलनीय करूण कहाणी यातून उलगडते. पण त्याही पलीकडे जाऊन या वेदनेच्या अंत:स्वराला न्याय देत, एका मुलीने दु:खाला सामोरं जायची, त्याच्या गाभ्यापर्यंत पोचायची केलेली हिंमत सामोरी येते. हाती गवसलेल्या जगण्यावर श्रद्धा ठेवत आपल्या लोकोत्तर वडिलांना आणि आई- भावाला तिने वाहिलेली ही हृद्य श्रद्धांजली म्हणूनच मोलाची ठरते !
: स्वाती राजे
swatijraje@gmail.com, bhaashaa.org@gmail.com